Thursday, September 27, 2007
ग्रुपच्या नावात बदल : गर्जा महाराष्ट्र माझा
मित्रांनो,
जय महाराष्ट्र या ग्रुपचे आपल्या महाराष्ट्राच्या सळसळत्या चैतन्यमय स्वरुपात नामकरण करण्याचा खूप आधीपासून मानस होता. तो आता प्रत्यक्षात उतरला आहे.
जय महाराष्ट्र या ग्रुपचे "गर्जा महाराष्ट्र माझा" असे नामकरण केले आहे.
तेव्हा ग्रुपच्या नव्या स्वरुपाचे स्वागत होईल ही अपेक्षा
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
- ग्रुप संयोजक
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/
Monday, April 30, 2007
वेडात मराठे वीर दौडले सात - कुसुमाग्रज
वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
"श्रुती धन्य जाहल्या,
श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥
"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत
"वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज
"वेडात मराठे वीर दौडले सात" या गीताची कथा.
"वेडात मराठे वीर दौडले सात" या गीताची कथा.
कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर. यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले. बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला. शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, "प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!" आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल. महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण... पण... सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं - सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं. ______________________________________ वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे. प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते. महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार - पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले. पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा. - नीलकांत.
Monday, April 23, 2007
सागरा प्राण तळमळला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणिन ॥
विश्वसलो या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी ॥
भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें ॥
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥
तो बाल गुलाबहि आतां ॥ रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥
विनायक दामोदर सावरकर
जयोऽस्तुते जयोऽस्तुते
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे १
राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तूची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखली,
वंदे त्वामहम्, यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे २
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूही,
स्वतंत्रते भगवती, योगीजन परब्रम्ह म्हणती,
वंदे त्वामहम्, यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे ३
हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकळचराचरशरण, चराचरशरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ४
जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे १
--कवि - विनायक दामोदर सावरकर
Wednesday, April 11, 2007
गर्जा महाराष्ट्र माझा
कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
¤ ¤ ¤ जय महाराष्ट्र ¤ ¤ ¤
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥
गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥
विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥
गीत मराठ्यांचे श्रवणी, मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥
¤ ¤ ¤ जय महाराष्ट्र ¤ ¤ ¤